Message from
Outgoing President Mayur Akole

    नमस्कार मंडळी,

    सर्व वाचकांना, हितचिंतकांना मयूर अकोले चा आदरपूर्वक नमस्कार.

    जिद्द व परिश्रमाचे पंख असतील तर आकाशाला गवसणी घालणं अवघड नसतं, असं
    म्हंटलं जातं. ते सिध्द करून दाखवलंय आमच्या सर्व मित्रांनी. शेवटपर्यंत
    आव्हानांना शेवट नव्हता, पण एकत्र राहून सर्व शिलेदार आव्हानांना सामोरे
    गेले व त्यावर मात करत मराठी मंडळ, दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग चे ९वे
    अधिवेशन पूर्ण यशस्वी झाले. पण माझ्या मनात खरे नायक आणि नायिका आहेत ते
    सर्व शिलेदारांचे कुटुंबिय. ह्या सर्व कुटुंबांनी आपल्या घरचे कार्य
    समजून, मानसन्मानाची अपेक्षा न करता, त्यांच्या घरातील स्वयंसेवकांना
    पूर्णपणे पाठिंबा दिला, आणि हाती आलेले/ घेतलेले काम पूर्ण करून त्या
    यशाचे भागीदार झाले.

    मराठी मंडळ, दक्षिण आफ्रिकेचा अध्यक्ष या नात्याने तुम्ही माझ्यावर जो
    विश्वास दाखवलात तो सार्थ करण्याचा, ती जाज्वल्य परंपरा चालू ठेवून,
    मूळच्या तत्त्वांना बाधा न आणता, सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात
    संस्थेचा कारभार अधिक वैश्विक करण्याचा आणि वाढवण्याचा आटोकाट प्रयत्न
    आम्ही करत आलो, त्यात सहकार्य लाभले ते २०१५ च्या कार्यकारणी सदस्यांचे,
    २०१६ मध्ये भर झाली ती अजय, निलेंद्र, महेश, प्रिया आणि सचिन व त्या नंतर
    च्या २०१७ च्या कार्यकारिणीत भर झाली ती जॉन भोसले व अमित देसाई यांची.
    महत्वाचे म्हणजे डर्बन च्या कार्यकर्त्रीणीची पूर्ण धुरा आज तागायत
    सांभाळली ती अमित मोरे व त्यांच्या कार्यकारिणी ने... या सर्वाना माझा
    मनः पूर्वक धन्यवाद!

    मराठी मंडळ, दक्षिण आफ्रिकेच्या आजपर्यंतच्या प्रवासात आमच्या काही
    गोष्टी चुकल्या आणि काही यशस्वी झाल्या. आम्ही त्यात शिकलो आणि यशस्वी
    गोष्टींना स्वीकारत गेलो. २०१८ च्या नवीन निवड झालेल्या मराठी मंडळामधील
    सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन, आणि खूप खूप शुभेच्छा!

    ‘गरम शेगडीवरील निखाऱ्यावर एक मिनिट हात ठेवल्यास, तो वेळ एक तासासारखा
    वाटतो, मात्र आनंदी वातावरणात व आपल्या आवडत्या लोकांच्या सहवासात एक तास
    एका मिनिटासारखा वाटतो, यालाच काल-सापेक्षता म्हणतात’. मला वाटते,
    आवडीच्या कामाचेही असेच असते! आमच्या कार्यकारिणीने मराठी मंडळाची सूत्रे
    तीन वर्षापूर्वी हाती घेतली, पण आत्ता कुठे काल/परवा हाती घेतले होते की
    काय, असे वाटते. गेल्या ३ वर्षात एकजुटीने आणि सलोख्याने काम करत तुम्हा
    सर्वांशी समन्वय राखला व महत्वाचे म्हणजे मला समाधान आहे, की आमच्या
    समितीने ज्या गोष्टी ठरवल्या होत्या, त्या बहुतेक सर्व गोष्टींची पूर्तता
    करण्यात आम्हांला यश आले, पण अजून हा प्रवास खूप मोठा आणि लांबचा आहे,
    त्यात बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. लंडनच्या बकिंगहॅम पॅलेसमधे होणाऱ्या
    changing of the guards सोहोळ्याप्रमाणे आता वेळ आलीयं ती तुम्हा
    सर्वांना अल्‌विदा म्हणण्याची, आणि नवनिर्वाचित कार्यकारिणीला शुभेच्छा
    देण्याची!

    गेली तीन वर्षें आम्ही ही मराठीची विजयपताका मोठ्या आनंदाने फडकवत होतो,
    तो विजयध्वज पुढेही फडकवत ठेवण्यासाठी यंदाच्या अधिवेशनात निवडून आलेले
    नवीन अध्यक्ष श्री धनंजय बेडेकर, उपाध्यक्ष प्रिया सुळे भागवत,
    सांस्कृतिक सचिव -अनिल पिसे,  कोषाध्यक्ष - अजय कुर्हेकर, कार्यकारिणी
    सदस्य: निलेंद्र परदेशी, आनंद आठलेय, अमित देसाई, जॉन भोसले, महेश
    काळकोंडा, सचिन सुर्वे, राजीव तेरवाडकर, मयूर अकोले कार्यरत राहणार आहेत.
    ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. जसा आम्हाला लोभ व आपले सहकार्य मिळाले, तसा
    त्यांनाही मिळेल ह्याबद्दल मला शंका नाही. पुढील २०१८ च्या नवीन
    कार्यकारिणीला मन:पूर्वक शुभेच्छा.

    जाताजाता आम्हाला या सेवेचा मान दिल्याबद्दल आपण सर्वांचे वैयक्तिक आभार मानतो,

    मराठी मंडळ दक्षिण आफ्रिकेच्या छताखाली तमाम मराठी माणूस एकवटायला हावाय
    आणि एकजुटीची भक्कम वज्रमूठ आवळून ठेवायला हवी. मंडळाची प्रगती व्हायला
    हवी, या पुढेही अनेक वर्षे महोत्सव साजरे व्हायला हवेत, मराठी भाषा व
    संस्कृती जपायला हवी, पण त्यासाठी मराठी लोकांमध्ये भाऊ बंधकी व संवाद
    वाढायला हवेत, संबध अधिक दृढ होऊन मराठी माणसाची उत्तरोत्तर प्रगती
    व्हायला हवी, या एक मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ.

    चला तर मग:

    ध्वज भाषेचा उंच धरा रे, हाती मिळवून हात चला रे!

    जय मराठी जय महाराष्ट्र, एकमुखाने ललकारा रे !

    जय हिंद, जय महाराष्ट्र!!


    कळावे, लोभ असावा आणि असलेला लोभ वृद्धींगत व्हावा अशी आशा ठेवतो.

    मयूर अकोले,
    अध्यक्ष (२०१५ ते २०१७) मराठी मंडळ, दक्षिण आफ्रिका
    [email protected] | www.mmsa.org.za | Visit Facebook page